चंद्रपूर- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारपर्यंत १०२ झाली होती. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी ८ रुग्णांची भर पडली आहे. हे ८ रुग्ण ब्रह्मपुरी तालुक्यातील आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११० झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ आहे. कोरोना आजारामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५६ आहे.
शुक्रवारी वाढलेल्या ८ रुग्णांमध्ये ब्रह्मपुरी शहरातील भवानी वार्ड येथे दोन रुग्ण आढळले. यामध्ये २७ वर्षीय पुरुष व २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे ४९ वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिला असे दोन रुग्ण आढळले. वांद्रा येथील ३० वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिला, निलज या गावातून देखील तीन वर्षीय बालिका आणि चौगान येथील ३२ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले. आजच्या ८ बाधितांपैकी २ बाधित हे अनुक्रमे मुंबई आणि हैद्राबाद येथून आले आहे. तर अन्य ६ बाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ११० वर पोहोचली आहे. आतापर्यत ५६ बाधित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ५४ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.