चंद्रपूर - शहरातील कचरा संकलनाच्या कंत्राटात मनपाने आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करीत काँग्रेसने आज महापालिकेच्या दारात धरणे आंदोलन केले. निविदा प्रक्रियेत महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने आर्थिक गैरव्यवहार केल्याने या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
हेही वाचा - चिमुर पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन
कचरा संकलनाचे जुने कंत्राट संपुष्टात आल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे यांच्यासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा तांत्रिक पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांमध्ये मे. स्वयंभूचा दर सर्वात कमी, म्हणजे १ हजार ७०० रुपये प्रतिमेट्रीक टन होता. यामुळे स्थायी समितीने या संस्थेला काम मंजूर केले. मात्र, नंतर ही सर्व प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मनपा प्रशासनाने या कामासाठी पुन्हा ई-निविदा मागितल्या. त्यात मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेला तब्बल आठशे रुपयांनी वाढ करीत कंत्राट देण्यात आले. आधी कमी दर टाकणाऱ्या कंत्राटदार कंपनीला लगेच नव्या निविदेत 800 रुपयांची वाढ कशी केली गेली, असा प्रश्न आंदोलकांचा आहे. त्यामुळे, यात मोठे अर्थकारण झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी केला.
न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा
तिवारी यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नगरविकास खात्याकडे केली आहे. तसेच, चौकशी न झाल्यास आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा तिवारी यांनी दिला. विशेष म्हणजे, हा घोटाळा तिवारी यांनीच पुढे आणला होता. महापालिकेतील प्रत्येक कंत्राट वादग्रस्तच ठरत असतात. आरोप-प्रत्यारोप होतात. पण, अशा वादग्रस्त कंत्राटांची चौकशी मात्र कधीच होत नाही. यापूर्वी डबे वाटप, जेवण वाटप, बायोमायनिंग प्रकल्प, अशा वादग्रस्त प्रकरणांबद्दलही हेच घडले. याही कंत्राटात तेच होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुख्य कार्यकारी अधिकारी 'अॅक्शन' मोडमध्ये; मुदतीत काम न करणाऱ्या 21 कंत्राटदारांचे काम बंद