चंद्रपूर - वाढत्या महागाईविरोधात महिला काँग्रेसने आज आंदोलन केले. यावेळी चूल पेटवून गरम पाण्यात फराळ तळून निषेध व्यक्त करण्यात आला.
जानेवारीपासून 250 रुपयांची वाढ
जानेवारीपासून आजपर्यंत तब्बल २५० रुपयांची दरवाढ सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. खाद्य तेलाचे भावदेखील गगनाला भिडले आहेत. अशावेळी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अडचणीचे झाले आहेत. याविरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस, सेवादल महिला काँग्रेस, सेवा फाऊंडेशन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून गरम पाण्यात चकल्या तळल्या. त्याच बरोबर पणत्यांमध्ये पाणी भरून वाढत्या खाद्य तेलाच्या दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
महागाईचा कडेलोट
गोरगरिबांचे जीवन वाढत्या महागाई मुळे उद्ध्वस्त झाले आहे. चुलीमुळे ४०० सिगारेटचा धूर महिलांच्या शरीरात जातो, म्हणून मोदींनी उज्ज्वला गॅस योजना आणली. परंतु त्याचेदेखील सिलिंडर आज १०००च्या घरात असल्यामुळे महिला पुन्हा चुलीकडे वळल्या आहेत, असे यावेळी ठेमस्कर म्हणाल्या. महागाईचा इतका कडेलोट करून त्यांनी गोरगरीबांचे जिने अवघड केले आहे. गृहिणीच्या मनाला घाव या मोदी सरकारने दिला आहे. कारण लेकराला गॅस आणि किराणा सामानाच्या दरवाढीमुळे उपाशी ठेवण्याची वेळ या मोदी सरकारने आणली आहे, म्हणूनच बांगड्यांचा अहेर मोदी सरकारला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना वाढत्या महागाईविरोधात निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला मतीन कुरेशी, महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी अली, शहर अध्यक्ष शीतल कातकर, जिल्हाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, असंघटित कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप सीडाम, नगरसेविका सुनीता लोढिया, नंदू नागरकर, संगीता भोयर, प्रशांत दानव, बल्लारपूर महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा मेघा भाले यांची उपस्थिती होती.