चंद्रपूर : २०१९ च्या विधानसभेत जनतेने कुणाच्याही बाजूने स्पष्ट निकाल न दिल्यामुळे भाजप-सेनेची चिंता वाढली आहे. त्यामुळे स्वतःचे संख्याबळ वाढवण्यासाठी आता अपक्ष उमेदवारांना ऑफेर देण्यात भाजप-सेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. याचेचं उदाहरण म्हणजे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना सेना आणि भाजप दोघांकडून ऑफर देण्यात आली आहे.
किशोर जोरगेवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी जोरगेवारांना मुंबईत भेटायला बोलावलं. यावेळी त्यांनी 'मुख्यमंत्री मीच होणार' त्यामुळे भाजपला आपलं समर्थन हवं असल्याचे फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे जोरगेवार यांनी मातोश्रीवरून काही लोक भेटायला आले आणि त्यांनी सुद्धा अशीच ऑफर दिली होती. त्यामुळे अपक्ष आमदारांचे समर्थन घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
किशोर जोरगेवार हे मूळचे भाजपचेच. सुधीर मुनगंटीवार यांचे ते खंदे समर्थक मानले जात होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणूकीत चंद्रपूर विधानसभेतून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज जोरगेवारांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर सेनतही घालमेल होत असल्यामुळे जोरगेवारांनी यंग चांदा क्रिकेट संघटनेची स्थापना केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशही केला मात्र, ऐन वेळेवर त्यांचा एबी फॉर्म अवैध ठरवल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा झाला. भाजपचे नाना शामकुळे यांच्या विरोधात तब्बल ७५ हजारांच्या फरकाने निवडून येत त्यांनी इतिहास नोंदविला. यातूनच जोरगेवारांची ताकद दिसून आली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्यामुळे सेनेला सोबत घेण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. सेनेकडे हीच संधी असल्याने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी सेनेने रेटून धरली आहे. आपला प्रभाव आणखी वाढावा म्हणून अपक्ष आमदारांचे समर्थन घेण्यासाठी या दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. म्हणूनच आपण आम्हाला समर्थन द्या, आपली कामे आम्ही प्रथमिकतेने करतो, अशी ऑफर जोरगेवार यांना दोन्ही पक्षांकडून देण्यात आली आहे. यापूर्वी मातोश्रीहून काही महत्त्वाच्या व्यक्तींनी जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला होता. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरगेवार यांना फोन करत मुंबईत भेटण्याचे आमंत्रण दिले आहे. याबाबत आपण आगोदर आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेणार असल्याचे जोरगेवारांनी संगीतले आहे.