चंद्रपूर - काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबडीचा धंदा आहे, या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी चंद्रपुरात एका जाहीर सभेला संबोधित केले.
भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ त्यांनी शहरातील कोहिनूर मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली. ही दिल्लीची निवडणूक आहे, गल्लीची नाही, असे सांगत ही देशाच्या मान सन्मानाची निवडणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा जाहीरनामा कोंबडीच्या धंद्यासारखा आहे. यातील गंभीर बाब म्हणजे काश्मीरातील सैन्य कमी करू ही आहे. हा काँग्रेसचा जाहीरनामा, की लष्करे तोयबाचा? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला.
देशद्रोहाशी संबंधित कलम हटविण्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. अतिरेकी आणि नक्षलवादी यांच्या घटनांविरोधी कृत्यांवर पायबंद कसा घालणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. चंद्रपुरात काँग्रेसला साधा उमेदवार सापडला नाही. अवैध धंदेवाला उमेदवार मैदानात असल्याचेही ते यावेळी बोलले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे उमेदवार हंसराज अहिर, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच युतीचे स्थानिक उमेदवार उपस्थित होते.