राजूरा (चंद्रपूर) - शुक्रवारी "जागतिक कामगार दिन" पार पडला. जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिन विशेष म्हणून हा दिवस साजरा केला जातो. देशाचा पर्यायाने जगाच्या विकासात अतुलनिय योगदान देणाऱ्या कामगारांची वाताहत लॉकडाऊनमध्ये थांबता थांबेनाशी झाली आहे. पोटाची खळगी भरायला गेलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
संचारबंदीतही घर गाठण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास कामगार पायीच करीत आहेत. उपाशी पोटी सुरू झालेल्या या प्रवासातील खाचखळगे अंगावर शहारे आणणारे आहेत. हा दिवस कामगारांचा सन्मान करणारा दिवस, मात्र घराकडे निघालेल्या या घामेजलेल्या अन् मनाने थकलेल्या कामगारांना कुणीच जवळ घ्यायला पुढे येईना, ही मोठीच शोकांतिका आहे.
कामगारांच्या घामातून जगाने विकासाची उंची गाठली. मात्र कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे सातत्याने दूर्लक्षच झाले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कामगारांच्या नशिबी भटकंती आली. लाखोंच्या संख्येत कामगारांचे एका प्रांतातून दूसऱ्या प्रांतात स्थलांतर सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील हजारो कामगार तेलंगाणात गेले. याच दरम्यान कोरोना विषाणुचा संसर्ग देशात पसरला अन् लाॕकडाऊन सुरू झाले. हे कामगार लाॉकडाऊनमध्ये अडकले. कुणी झाडांच्या आसऱ्याने, कुणी शेतात, कुणी मंदीरात आसरा घेऊन लाॉकडाऊन उठण्याची प्रतिक्षा करीत आहेत. या प्रतिक्षेत जवळची पुंजी संपल्याने अनेकांनी घर गाठण्यासाठी पायी प्रवास सुरू केला.
घराकडे निघालेले कामगारांचे लोंढे रोजच रस्त्यावर दिसू लागले आहेत. शेतातून, घनदाट जंगलातून या कामगारांचा लपतछपत प्रवास सुरू आहे. पोटात अन्नाचा कण नाही. केवळ पाणी पिऊन कामगार घराच्या दिशेने निघाले आहेत. घामेजलेले चेहरे, थकलेलं शरीर अन् अंगावरील मळकट कपडे बघून या कामगारांना कुणी जवळ घ्यायला तयार नाहीत. मृत्युच्या भीतीने माणूसकी काळवंडली आहे. पायी निघालेल्या या कामगारांना काही-काही गावात पाणीही मिळेनासे झाले आहे. गावात आसरा घ्यायला गेलेल्या कामगारांना गावकरी हाकलून लावत आहेत. कामगारांची आपबीती मन सून्न करणारी आहे.
घराच्या ओढीने गुराढोरासारखे मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. अशा बिकट स्थितीत सामाजिक दायित्व जोपासणाऱ्या काही हातांनी या कामगारांना मदतीचा हात पुढे केला. क्वचितच मिळणाऱ्या या मदतीच्या आधारावर शेकडो मैलाचा प्रवास कामगार करित आहेत. परराज्यात अडकलेल्या कामगारांना परत आणण्यासाठी शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. मात्र, त्यांना फक्त त्यांच्या घरी पोहचवल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये आणि नंतर त्यांच्या हाताला काम मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.