चंद्रपूर - एक तीन वर्षीय चिमुकली घरासमोर असलेल्या नाल्यात तोल जाऊन पडली. ती पुलात जाऊन अडकली, यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलावाडा येथे घडली असून, सानू मंगेश चुनारकर (वय 3 वर्ष), असे मृतक मुलीचे नाव आहे. मूल तालुक्यातील चिमडा येथील ती रहिवाशी ( three year old girl died in drowning chandrapur ) होती.
गोंडपीपरी तालुक्यात येणाऱ्या विठ्ठलवाडा येथे नातेवाईकाकडे तीन दिवसांपूर्वी आईसोबत सानू आली होती. जिल्ह्यात मूसळधार पाऊस सुरू असल्याने ती विठ्ठलवाड्यात थांबली होती. संततधार पावसाने नदी, नाले, गावातील नाली पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. त्यात आज ( 10 जुलै ) घरासमोरील नालीत पाय घसरून ती पडली. नाली तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नालीलगत असलेल्या पुलात जाऊन ती अडकली.
घरच्यांनी आरडाओरड करताच तिला वाचविण्यासाठी दोन युवक नालीत उतरले. तीला पुलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुलाखाली दहा ते पंधरा मिनिट ती अडकून होती. पुलाखालून कसेबसे तिला बाहेर काढण्यात आले. मात्र, ती बेशुद्ध अवस्थेत होती. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी हलविण्यात आले. पण, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे