चंद्रपूर - सोमनाथ प्रकल्पात चौकीदार असलेल्या कुष्ठरूग्णाचा खून झाल्याची घटना समोर आली. धारदार हत्याराने भोकसून त्यांचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. नारायण निकोडे (वय ७५) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ प्रकल्पामध्ये ते चौकीदार म्हणून कार्यरत होते.
२० जानेवारीपासून होते बेपत्ता -
सोमनाथ प्रकल्प हा कुष्ठरूग्णांच्या सेवेसाठी ओळखला जातो. या ठिकाणी सावली तालुक्यातील गेवरा गावचे रहिवासी नारायण निकोडे हे राहत होते. 2008 मध्ये कुष्ठरोगी म्हणून ते येथे दाखल झाले होते. याच ठिकाणी निकोडे चौकीदार म्हणून शेतावर देखरेख करण्याचे काम करत होते. एका झोपडीवजा खोलीत ते एकटे राहत होते. 20 जानेवारीपासून ते बेपत्ता होते. याबाबत मूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
बंधाऱ्यात सापडला मृतदेह -
निकोडे बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. आजूबाजूला जंगलाचा परिसर असल्याने एखाद्या जंगली श्वापदाने हल्ला केला, असावा अशी शक्यता होती. मुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वन विभागचे कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या शोध मोहीम राबवत जंगलात शोध घेतला. दरम्यान निकोडे यांच्या राहत्या घराचा मागील भागात असलेल्या बंधाऱ्यात नारायण यांचा मृतदेह शुक्रवारी आढळला. त्यांचा शरिरावर व पोटावर टोकदार व धारदार हत्याराने भोसकल्याच्या अनेक जखमा होत्या. यावरून त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणाचा पुढील तपास उप-विभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत व सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे करत आहेत.
शीतल आमटे प्रकरणाशी संबंध?
महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी ३० नोव्हेंबर २०२०ला विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस अगोदर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात त्यांनी महारोगी सेवा समितीच्या विश्वस्तांवर आणि कार्यकर्त्यांवर आरोप केले होते. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आलेल्या दबावानंतर डॉ. शीतल आमटे यांनी काही वेळात व्हिडिओ काढून टाकला होता. डॉ. विकास आमटे, प्रकाश आमटे, मंदा आमटे आणि भारती आमटे यांनी एकत्रित पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. सोमनाथ प्रकल्पाच्या चौकीदाराचा खून झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. शीतल आमटे आत्महत्या प्रकरण आणि नारायण निकोडे खून प्रकरणाचा संबंध असल्याचे बोलले जात आहे.