चंद्रपूर - चंद्रपूर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डब्बे घसरल्याने विस्कळीत झालेली वाहतूक सकाळी सहाच्या सुमारास सुरळीत झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक तासांचा वेळ लागला. त्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशीराने धावत आहेत.
शुक्रवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास चंद्रपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाडीचे दोन डबे रुळावरून घसरले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, डबे हटवण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. यामुळे या मार्गावरून जाणारी रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. उत्तर आणि दक्षिणला जोडणारा चंद्रपूर मार्ग हा महत्वाचा रेल्वे मार्ग आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने स्थानकावर येणाऱ्या गाड्यांच्या वेळातही बदल करावा लागला.