चंद्रपूर : अपघातामध्ये मृत्यूमुखी झालेल्या महिलेवर मानसिक औषधोपचार सुरू होते. ती नेहमी नदी-नदी करत असायची, अशी माहिती समोर येत आहे. महिलेला नदीची ओढ लागली होती. मात्र ती गर्भवती असल्याकारणानं या गोळ्या बंद करण्यात आल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे. त्या दृष्टीने आता पोलीस तपास करणार आहेत.
सुषमा काकडे या बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे आपले पती आणि चार वार्षिय मुलासोबत राहायच्या. 18 ऑक्टोबरच्या सायंकाळी मुलाने चॉकलेटची मागणी केल्याचं पतीला सांगत त्या आपल्या मुलाला घेऊन दुचाकीने बामणी ते राजुरा या मार्गाने निघाल्या. मात्र या मार्गावरील पुलावर त्यांचा अचानक तोल गेला. आपल्या मुलासह त्या दुचाकी घेऊन पुलाखाली कोसळल्या. विशेष म्हणजे पडताना त्या मानेच्या भारावर कोसळल्या. हा भाग अत्यंत नाजूक असल्याने पाठीचा मणका तुटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्या ठिकाणी नदीच्या पात्रात त्या कोसळल्या तिथे घट्ट चिखल होता.
चिमुकला आईच्या मृतदेहाजवळ रात्रभर बसून- महिलेच्या शरीराच्या कुठल्याही भागावर कोसळल्या असत्या तरी वाचण्याची शक्यता अधिक होती. कारण त्यांच्या शरीरावर अन्य कुठल्याही जखमा नाहीत. शवविच्छेदन करताना अशा कुठल्याही मोठ्या खाणाखुणा त्यांच्या शरीरावर नव्हत्या. मुलगादेखील याच चिखलात कोसळला. त्याला काही झाले नाही. मात्र रात्रभर हा चिमुकला आपल्या आईला पकडून टाहो फोडत होता. मात्र त्याचा आक्रोश कुणाच्या कानावर गेला नाही. सकाळपर्यंत हा चिमुकला आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी यावरून जात असणाऱ्या लोकांना ही बाब निदर्शनास आली. त्यांना सर्वांना मोठा धक्का बसला. याची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली. यानंतर आई आणि मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले. तर मुलावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नदीची लागली होती ओढ- मानसिक उपचार असल्यानं महिला औषधे घ्यायची. मात्र त्या तीन महिन्याची गर्भवती असल्याकारणानं होणाऱ्या बाळावर विपरीत परिणाम होण्याच्या डॉक्टरांनी औषध बंद करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. महिला गेलेल्या ठिकाणी कुठलेही मोठे दुकान नाही. हा रस्ता अत्यंत निर्मनुष्य समजला जातो. रात्रीच्या वेळी येथे सहसा कोणी जात नाही. अशा वेळेस त्या नेमक्या या रस्त्याने कुठे जात होत्या, याचा पत्ता अद्यापही लागलेला नाही. त्यासंदर्भात पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
लवकरच सत्य समोर येईल- बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमेश पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या घटनेचा तपास सध्या सुरू आहे, अशी माहिती दिली आहे. घटनेत प्राथमिकदृष्ट्या कुठलाही घातपात झाल्याचे दिसून येत नसल्याचं त्यांनी सांगितले. मात्र त्या चॉकलेट घेण्यासाठी निर्जन रस्त्यामध्ये जाण्यामागचे नेमके काय कारण आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. त्यांच्या औषधोपचाराबाबतदेखील आम्हाला माहिती मिळालेली आहे. लवकरच याबाबत याचा उलगडा होईल.
हेही वाचा-