चंद्रपूर : येथील युवक काँग्रेसचा प्रदेश सचिव सचिन कत्याल याचे नाव वाळूतस्करीत समोर आले असून या प्रकरणात त्याला सहआरोपी करण्यात आले आहे. मात्र, चार दिवस लोटूनही अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीतही कत्याल याने आज 'फेसबुक'वर आवर्जून पोस्ट केली. काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्याबद्दल त्याने नवनियुक्त शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांना भरभरून शुभेच्छा दिल्या. यानंतर काही वेळाने त्याने ही पोस्ट डिलीट केली. मात्र, अजूनही अटक न होऊ शकलेल्या कत्यालने या पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनाच वाकुल्या दाखवल्या आहे.
रामनगर पोलिसांनी शुक्रवारी अजयपूरजवळ अंधारी नदीतील वाळूतस्करीची मोठी कारवाई केली. यात तुळशीराम देवतळे आणि आदिल खान यांना अटक करण्यात आली. मात्र, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन कत्यालचे नाव समोर आले, तेव्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले. यातील जेसीबी ही सचिन कत्याल याच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री कत्याल आणि निशांत आंबटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर, कत्यालला सहआरोपी करण्यात आले आहे.
या प्रकरणात सोमवारी दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस हे कत्यालच्या मागावर आहे, असे सांगितले जाते. मात्र, कत्याल हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र, अशा परिस्थितीतही कत्याल आपल्या पक्षाची जबाबदारी पार पाडायला विसरला नाही. आज (बुधवार) काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून रामू तिवारी तर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश देवतळे यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात कत्याल याने फेसबुकवर पोस्ट टाकून दोन्ही जिल्हाध्यक्षांना जाहीर शुभेच्छा दिल्या.
यानंतर काही वेळात कत्यालने ही पोस्ट डिलीट केली. यावर आता पोलीस प्रशासन नेमका कुठला तपास करते. त्या प्रोफाइलची सायबर सेलकडून तपासणी होते का, त्यातून कुठला तपशील हाती लागतो, यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कत्यालची याची वाळूतस्करीत नेमकी काय भूमिका आहे, हेही चौकशीअंतीच स्पष्ट होणार आहे.