चंद्रपूर : चंद्रपूर मनपाकडून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला ( Chandrapur Municipal Corporation Water Supply ) जातो. यासाठी नागरिकांना कर भरणा करावा लागतो. या योजनेसाठी मनपाला दर महिन्याकाठी 60 ते 70 लाखांचा खर्च होतो. यापूर्वी नागरिकांकडून कर भरणा नियमित केला होता. मात्र त्यानंतर कोरोना आला आणि नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले. त्यामूळे ही करवसूली आता थंडबसत्यात गेली आहे. कर वसूलीचे प्रमाण हे 13 ते 14 टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे आज घडीला पाटबंधारे विभागाचे 18 कोटी 43 लाखांची कराची रक्कम चंद्रपूर मनपावर बसली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना ही मनपासाठी डोईजड ठरत असल्याचे चित्र आहे.
नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध : चंद्रपूर शहरातील नागरिकांना दररोज सकाळी नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. आजघडीला शहरात 37 ते 38 नळजोडणीधारक आहे. महिनाभर पाणीपुरवठा केल्यानंतर केवळ 120 रुपयांचा कर नळधारकांकडून वसूल केला जातो. परंतु, एवढा नाममात्र पाणीकर भरण्याकडे चंद्रपूरकर दुर्लक्ष करीत ( Chandrapur Citizen Ignore Water Tax ) होते. अशात दोन वर्षांपूर्वी कोरानाचा महाप्रकोप आला. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे पाणीकर भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मागील काही वर्षांत थकीत पाणी कराचा आकडा हा 12 कोटी 97 लाख 60 हजार 191 रुपयांवर गेला आहे. चालू वर्षातील वसुलीचा आकडा हा 5 कोटी 45 लाख 51 हजार 14 रुपये आहे. डिसेंबर 2022 या चालू महिन्यापर्यंत 2 कोटी 93 लाख रुपये चालू आणि थकीत पाणी कराची वसुली करण्यात आली आहे.
कर भरण्याकडे दुर्लक्ष : थकीत कराची वसूली व्हावी यासाठी महापालिकेकडून नळधारकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. ऑक्टोबरपर्यंत 10, तर डिसेंबरपर्यंत कराचा भरणा करणाऱ्यांना 5 टक्के सूट देण्यात आली आहे. यानंतरही कराचा भरणा करण्याकडे नळजोडणीधारकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेला पाणीपुरवठा योजना चालविणे कठीण झाले आहे. वसुलीवर परिणाम होण्यासाठी कर विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे हे कारणसुद्धा कारणीभूत आहे.
73 नळजोडण्या कापल्या : पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी महापालिकेला महिन्याकाठी 60 ते 70 लाखांचा खर्च येते. यात वीज बिलाचा आकडा हा 35 लाखांच्या घरात आहे. परंतु, पाणी कराच्या वसुलीचे प्रमाण एकदम कमी आहे. त्यामुळे पाणीकराचा भरणा करण्यासंदर्भात अनेकदा नोटीस पाठविण्यात आल्या. त्याकडेही सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या नळजोडणीधारकांचे नळ कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावर्षी 73 कुटुंबांकडील नळजोडण्या कापण्यात आल्या ( 73 taps water supply cut ) आहेत.
नागरिकांनी सहकार्य करावे : चंद्रपूर शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध देण्याचे काम मनपाकडून केले जात आहे. त्यासाठी पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेवर महिन्याकाठी लाखोचा खर्च होतो. परंतू, करापोटी मिळणारे उत्पन्न कमी आहे. चंद्रपूरकरांनी पाणी कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष केल्याने थकीतचा आकडा 18 कोटींवर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमित कराचा भरणा करून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी केले आहे.