चंद्रपूर - वैद्यकीय रुग्णालयात स्पष्टपणे भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येऊन देखील वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी याची चौकशी करण्याऐवजी या पत्राला केराची टोपली दाखवली. असे करीत त्यांनी या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना भारत सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी कामगार नेते पप्पू देशमुख यांनी महामहीम राष्ट्रपती यांना पत्र लिहून केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० च्या जवळपास कंत्राटी कामगारांचे मागील ७ महिन्यांपासून पगार थकीत आहेत. यापूर्वी सुद्धा कामगारांचे ६ महिने पगार थकीत होते. ६ महिन्यांचे पगार थकीत असताना एप्रिल २०२० मध्ये प्रदीप खडसे या कामगाराचा घरी तसेच ऑगस्ट २०२० मध्ये संगीता पाटील या महिला कामगाराचा कामावर असताना रुग्णालयात जागेवर कोसळून मृत्यू झाला. या दोन्ही कामगारांचा आर्थिक व मानसिक तणावाने मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचा आरोप जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे. यावेळी ७ महिन्यांपासून पगार थकीत असल्याने सर्व कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली असुन थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी कामगारांनी ८ फेब्रुवारी २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'डेरा आंदोलन' सुरू केले.आंदोलनादरम्यान आतापर्यंत ४ कामगारांची प्रकृती बिघडलेली आहे.
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार
वैद्यकीय महाविद्यालयात जुलै २०१९ मध्ये कंत्राटी कामगार पुरविण्याच्या कामांमध्ये किमान वेतनापेक्षा कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्याचा भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराची पप्पू देशमुख यांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार केल्यानंतर समितीचे तत्कालीन अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने पुरावे तपासून अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांना दिले. मात्र, डॉ.लहाने यांनी समितीने दिलेल्या पत्राला तसेच त्यानंतर पाठवलेल्या दोन स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली.
यानंतर कामगारांनी आंदोलन पुकारल्यावर शासनाने ५ मार्च २०२० रोजी भ्रष्ट मार्गाने मंजूर झालेले कंत्राट रद्द केले.या दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे गरजेचे असतानाही वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.लहाने यांनी कंत्राटदारांना अभय दिले. कराराचा भंग केला म्हणून ७ महिन्यांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या याच कंत्राटदारांना पुन्हा पुनर्जीवित करून मुदतवाढ देण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डाॅ. लहाने करीत आहेत.
कामगार दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेल्या किमान वेतनापासून वंचित
चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. राजेंद्र सुरपाम व संजीव राठोड यांनी कामगार विभागात ९ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये खुद्द ही माहिती सहायक कामगार आयुक्त नितिन पाटणकर यांना दिली. मर्जीतल्या कंत्राटदारांचे हित जोपासण्यासाठी डॉ. लहाने व अधिष्ठाता कार्यालय नियम धाब्यावर बसवून काम करीत असल्याचा आरोप जन विकास कामगार संघाने केलेला आहे. संचालक व अधिष्ठाता कार्यालयाच्या भ्रष्टाचारामुळे २ कामगारांचा बळी गेला. तसेच ५०० कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. बहुसंख्येने अनुसूचित जाती-जमातीचे असलेले कामगार दोन वर्षांपूर्वी शासनाने मंजूर केलेल्या किमान वेतनापासून वंचित आहेत.
या भ्रष्टाचाराची संचालक डाॅ. लहाने उघडपणे पाठराखण करित असल्याने त्यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराची प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरस्काराचे नियमन १० मधिल तरतूदींचा वापर करून डॉ. लहाने यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची मागणी करणारे पत्र जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले आहे.