चंद्रपूर - दुर्गापुर परिसरात अनेक लोकांचा जीव घेणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश मिळवले ( Caught Man Eater Leopard in Chandrapur ) आहे. या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने काढले होते. मात्र त्याला वनविभागाच्या पथकाने शिताफीने बेशुद्ध करून पकडले.
चंद्रपूर शहराला लागूनच दुर्गापुर वसलेले आहे. त्याला लागूनच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र सुरू होते. या ठिकाणी मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. मागील तीन वर्षांत या परिसरातील तब्बल 13 लोकांना वाघ आणि बिबट्याने आपला शिकार बनवले. मागील काही दिवसांत तर बिबट्याने येथे धुमाकूळ घातला होता. त्याला पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश ( Chandrapur Forest Department caught man eater leopard ) आले.
30 मार्चला प्रतीक बावणे नामक आठ वर्षीय मुलाला घराच्या मागे खेळत असताना ठार केले. 2 मे ला लता मेश्राम या 45 वर्षीय महिलेचा नरडीचा घोट बिबट्याने घेतला. यापूर्वी एक बिबट्या पकडण्यात आला होता, मात्र लोकांना मारणारा हा दुसराच बिबट्या असल्याचे या दोन घटनांतून समोर आले. याच दरम्यान 10 मेला रात्री 9 वाजताच्या सुमारास तीन वर्षीय चिमुकली घरी खेळत असताना बिबट्याने झडप घालून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. तिच्या आईने काठीने मारून या बिबट्याला परतवून लावले आणि पुढील अनर्थ टळला. मात्र या घटनेनंतर जनक्षोभ उसळून आला.
इंजेक्शन देऊन केले बेशुद्ध - वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल पाच तास लोकांनी नजरकैदेत ठेवले. त्यानंतर या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढण्यात आले. आधी त्याला जेरबंद केले जाईल ते शक्य न झाल्यास त्याला गोळ्या घालण्यात येईल असे आदेशात नमूद होते. त्यानुसार वनविभागाचे पथक या बिबट्याचा कसून शोध घेत होते. आज पहाटे चार वाजता हा बिबट आढळून आला. त्यानुसार शूटर अजय मराठे यांनी बंदुकीतून बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन मारले. यावेळी ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी रवी खोब्रागडे, अतुल मोहूर्ले, भोजराज दांडेकर, अमोल तिखट, सुनील नन्नावरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर या कारवाईमध्ये सहभाग होता. बिबट पकडला गेल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
हेही वाचा - Nav Sankalp Shivir : चिंतन शिबिरासाठी राहुल गांधी पोहोचले उदयपूरला, गहलोत यांनी केले भव्य स्वागत