चंद्रपूर - मागील सहा दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. इरई धरणाचे सातही ( Chandrapur Erai Dam ) दरवाजे 1.25 मीटरने उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना पुराची झळ पोहोचली आहे. चंद्रपूर शहरातील रहेमतनगर, राजनगर, सिस्टर कॅालनी येथील शेकडो घरांत पाणी घुसले. शंभराहून अधिक कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने राजुरा-हैद्राबाद मार्ग बंद झाला आहे. पोडसा पुलावरुन पाणी असल्यामुळे महाराष्ट्र-तेलंगना मार्ग बंद झाला आहे. प्रशासनाने बचाव पथक तयार केली असून पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
जिल्ह्यातील वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, अंधारी, इरई, झरपट या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चंद्रपूर शहरातील शंभर कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविले. मनपातर्फे येथे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. झरपट नदी दुथडी भरून वाहत आहे. हनुमान खिडकी, पठाणपुरागेट परिसरात पाणी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेचे पठाणपुरा व रहमतनगर येथील दोन्ही सिव्हारेज ट्रीटमेंट प्लांट पुराच्या पाण्याखाली आले आहेत. पूरग्रस्त भागाची खासदार बाळू धानोरकर यांनी पाहणी करून लोकांशी संवाद साधला, तथा प्रशासनाला तत्काळ व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. वर्धा नदीच्या पुलावर पाणी आल्याने राजुरावरून चंद्रपूरकडे जाणारा राज्य मार्ग बंद झाला आहे. राजुरा शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली. त्यामुळे पुढील दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कोलगाव हे गाव वर्धा नदीच्या पुरामुळे पाण्याने वेढले गेले आहे. चौदा घरांची पझडड झाली आहे. गोंडपिपंरी तालुक्यातील पोडसा पुलावरून पाणी वाहत असल्याने महाराष्ट्र-तेलंगाना राज्यमार्ग बंद झाला आहे. तालुक्यात जवळपास चाळीस घरांची पडझड झाली. राजुरा-आसिफाबाद रस्ता बंद आहे. चुनाळा - विरुर, टेंबुरवाही ते विरुर हा मार्ग मोठ्या नाल्यांच्या प्रवाहामुळे बंद झाला आहे. बल्लारपूर तालुक्यात आतापर्यंत ९० घरांची पडझड झाली आहे. नदी, नाल्यांना पूर असल्याने चारगाव-हडस्ती, कोठारी-कवडजई, बल्लारपूर-राजुरा, कोठारी-तोहगाव, लावारी-देहरी, माना-चारवट असे सहा मार्ग बंद आहेत. भद्रावती व माजरी तालुक्यात प्रचंड पाऊस झाल्याने माजरी रस्ता दुसऱ्या दिवशी बंद आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी वाहून गेलेल्या संजय कंडेलवार याचा मृतदेह आज अमलनाला येथे मिळाला.