चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सैन्याला पाचारण करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल याची मदत उपलब्ध नसल्याने सैन्याला पाचारण करण्यात आले. भद्रावती तालुक्यातील माणगाव ( Mangaon in Bhadravati Taluka ) येथील 113 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात ( 113 people Shifted to Safe Place ) आले आहे. मात्र, याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसार माध्यमांसमोर येऊ दिली नाही. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरवाडे ( Disaster Management Officer Surwade ) यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या बचाव कार्यबाबत दुजोरा दिला. 20 जुलैच्या दुपारपर्यंत हे कार्य सुरू होते.
विदर्भातील पूरसदृश परिस्थितीवर लष्कराचे मदतकार्य : राज्य सरकारच्या विनंतीनुसार, पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि बचावासाठी मदत करण्यासाठी विदर्भात सैन्य तैनात करण्यात आले होते. 19 जुलै 2022 रोजी रात्री 10.30 वाजता मेजर भुवन शाह यांच्या नेतृत्वाखाली गार्ड्स रेजिमेंटल सेंटर (GRC) कॅम्पटी येथील सैन्य दल आवश्यक उपकरणांसह प्रभावित भागात पोहोचले. त्यांनी बचावकार्य तातडीने सुरू करीत, गावातील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्याद्वारे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात आले.
आतापर्यंत 113 गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले : 20 जुलै 2022 रोजी पहाटेच्या सुमारास माणगाव, जिल्हा चंदरपूर या गावात लष्कराचे बचाव कार्य सुरू झाले. पुरामुळे गाव पूर्णपणे तुटले आहे. लष्करी बचाव पथक नागरी अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांच्या संयोगाने सतत कार्यरत आहे. 20 जुलै 2022 पर्यंत 113 गावकऱ्यांची सुरक्षित ठिकाणी सुटका करण्यात आली. पूरस्थितीनुसार पुढील गरज भासल्यास प्रतिसाद देण्यासाठी कॅम्पटी कॅन्टोन्मेंट येथे एक टीम तयार ठेवण्यात आली आहे. ब्रिगेडियर दीपक शर्मा, कमांडंट, जीआरसी यांनी सैन्याने केलेल्या ऑपरेशन्सचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळांना भेट दिली.
विदर्भात गेली काही दिवसांपासून मुसळधार : विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडल्याने नागपूर उपविभागातील चंद्रपूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानेसुद्धा विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे पाऊस चालू असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या या भागात कार्यरत आहेत.