चंद्रपूर - केंद्र सरकारच्या सीएए आणि प्रस्तावित एनआरसी कायद्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्यावतीनं शहरात मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मुस्लिम बांधवांसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. हातात केंद्र सरकारच्या विरोधी आणि निषेध करणारे फलक झळकावत, नारे देत हा मोर्चा चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गानं निघाला. यावेळी राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही हा कायदा महाराष्ट्रात आणि देशात लागू होऊ देणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
प्रारंभी काही अंतरापर्यंत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. त्यानंतर खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी नेतृत्वाची कमान सांभाळली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचं रूपांतर जाहीरसभेत झाले. नेत्यांच्या भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.