चंद्रपूर - ज्या जिल्ह्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही अशा जिल्ह्यांबाबत नेमक्या काय सूचना आहेत याचे अधिकृत आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे, अधिकृत आदेश आल्याशिवाय ज्यांना लिखित परवानगी दिलेली नाही, अशा कोणत्याही व्यापारी प्रतिष्ठानांना उघडू नये. जिल्ह्यातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांसाठी शनिवारी जारी करण्यात आलेल्या व्हिडिओ संदेशमध्ये काही ठिकाणी परस्पर दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल जिल्हाधिकारी खेमणार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता दिल्या गेलेली नाही. त्यामुळे लिखित परवानगी दिल्या गेलेल्या व्यापारी प्रतिष्ठानांव्यतिरिक्त अन्य दुकाने उघडण्यात येऊ नये. राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय आल्यानंतर व जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भात लेखी आदेश दिल्यानंतरच याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले आहे.