चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात चेकतळोधी गावात चोरीची घटना घडली आहे. घरातील सर्व सदस्य शेतावर कामाला गेल्यानंतर चोरट्यांनी घरातील तीन तोळे सोने लंपास केले. घरातले सदस्य जेव्हा सायंकाळी घरी परतले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
तीन महिने नवरा बायकोने शेतात प्रचंड मेहनत घेतली. निसर्गानेही चांगली साथ दिली. कापसाचे चांगले उत्पन्नही झाले. कापूस विकला आणि लाखो रूपये घरात आले. त्यामुळे बँकेत तारण म्हणून ठेवलेले तीन तोळे सोने या दांपत्याने सोडवून घरी आणले. अन् समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र, त्यांचे हे समाधान फार वेळ टिकले नाही. कारण दुसऱ्या दिवशी दोघेजण शेतात कामाला गेले असता, चोरट्यांनी घर फोडून घरातील सोने लंपास केले.
हेही वाचा... एक रात्र भूतांसोबत... अंनिसचा अभिनव प्रयोग
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीजवळ चेकतळोधी गाव आहे. या गावात सुनील ढपकस हे शेतकरी आपल्या कुटुंबियांसह राहतात. काही महिन्यांपुर्वी शेती व इतर कामांसाठी त्यांनी गोंडपिपरीतील भाग्यश्री बँकेत तीन तोळे सोने गहान ठेवले आणि कर्ज घेतले होते. त्यानंतर या उभय पतीपत्नीने शेतात प्रचंड मेहनत घेतली. निसर्गानेही त्यांना चागंली साथ दिली. वीस क्विटंलहून अधिक कापसाचे उत्पन्न झाले. कापूस विकून घरी लाखो रूपये आले. त्यानंतर त्यांनी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून ते घरी आणले.
हेही वाचा... VIDEO: क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा, तलवारीने सपासप वार
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे पतीपत्नी शेतात कामाला गेले. दिवसभर काम करून ते सायंकाळी घरी पोहचले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात ठेवलेले सोने चोरट्यांनी लंपास केले होते. यानंतर त्यांनी गोंडपिपरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, प्राथमिक तपासणी केली. दरम्यान याबाबत अधिक चौकशी करू, अशी माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे अधिकारी संदीप धोबे यांनी दिली आहे.