चंद्रपूर - पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार या गावात रोजगार हमी योजनेच्या नावाने बोगस कामे सुरू असल्याचे समोर आले आहे. जे गावात राहातच नाही अशा लोकांची नावे मजुरांच्या यादीत टाकत लाखों रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. त्याचा कळस म्हणजे एक महिला जी लकवाग्रस्त असल्याने अंथरुणावर खिळून आहे, तिचे मजूर म्हणून नाव टाकून पैसे लाटण्यात आले आहे. भावना अनिल बुरांडे असे या महिलेचे नाव आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार कुठल्या थराला गेला आहे, याचा खुलासा उलगुलान संघटनेचे संस्थापक राजू झोडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
अनेक आठवडे लाटली रक्कम
ग्रामीण भागातील मजुरांचे स्थलांतर होऊ नये, त्यांना गावातच रोजगार मिळावा, यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. यामध्ये पांदण रस्ते, मजगी आणि इतर कामांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये बोगस मजूर यादीत दाखवून पैशांची उचल केली जात असल्याचा प्रकार पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार या गावात समोर आला आहे. माहितीच्या अधिकारात ह्या संपूर्ण प्रकारचं बिंग फुटले असून याचा खुलासा पत्रकार परिषदेत करण्यात आला. संवर्ग विकास अधिकारी साळवे, सहयोगी अधिकारी हेमंत येरमे यांनी बोर्डा गावातील रोजगार सेवक कार्तिक बुरांडे याला हाताशी धरून जे नागरिक गावात राहतच नाहीत, जे कधीही कामावर गेले नाही अशा लोकांच्या नावाने बोगस काम दाखवून अनेक आठवडे त्यांच्या नावाची रक्कम लाटली. जेवढे काम झाले त्यापेक्षा जास्त काम झाल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करण्यात आली.
मस्टर गहाळ
याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता मस्टर गहाळ झाल्याचे सांगत अर्धवट माहिती देण्यात आली. जी माहिती देण्यात आली त्यात हा भोंगळ कारभार समोर आला आहे. मात्र, हा भ्रष्टाचार त्यापेक्षा मोठा आहे असा आरोप करण्यात आला. पत्रकार परिषदेत उलगुलान संघटनेचे संस्थापक राजू झोडे, रुपेश निमसरकार, नितेश रामटेके, हिमतलाल मांडवगडे यांची उपस्थिती होती.
ही आहेत बोगस मजुरांची नावे
जे कधी कामावर गेलेच नाही अशा लोकांची बोगस नावे यात टाकण्यात आली आहेत. यात ओंडू रामटेके, राकेश देशेट्टीवार, वेणूताई मानकर, आकाश रामटेके, मयूर नैताम, राणी बुरांडे, सुरेश गावडे, भावना बुरांडे, अक्षय बुरांडे, तेजराज बोदलकर, मीना शिंदे, वसंत बुरांडे, समीर बोधलकर, श्रीनाथ गदेकर, रुपेश सातपुते, हिमा सातपुते, अविनाश देऊरमल्ले, धनराज बुरांडे, अश्विनी बुरांडे यांचा समावेश आहे.