चंद्रपूर - ताडोबात काळा बिबट्या दिसून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आशियात काळा बिबट्या आढळणे दुर्मिळ असल्याने हा बिबट्या चर्चेचा विषया ठरला आहे. हा काळा बिबट्या पुन्हा एकदा चर्चेत आला असून या बिबट्याने एका सांबराची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र सांबराने त्याला हुलकाणी दिली आहे.
ताडोबात काळा बिबट्या असल्याचे काही महिन्यांपूर्वीच समोर आले. बेल्जियममधून आलेल्या कुटुंबाने या काळ्या बिबट्याला पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद केले आणि सर्वांसाठीच हा बिबट्या कुतूहलाचा विषय ठरला. असा बिबट्या अत्यंत दुर्मिळ समजला जातो. जेव्हा शरीरातील मेलेनिनचे प्रमाण वाढते तेव्हा, असे होते. ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध अभयारण्य असले, तरी हा बिबट्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यानंतर अनेक पर्यटकांना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले.
या बिबट्याचा शिकार करतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबईतील सिद्धेश मुणगेकर यांनी याचे चित्रीकरण केले आहे. यात हा काळा बिबट्या अत्यंत सावधगिरीने सांबराचा ठाव घेताना दिसत आहे. शिकार करताना किती पराकोटीचा संयम लागतो, याचे दर्शन यात घडताना दिसून येत आहे. 1 मिनिट 32 सेकंदाच्या या व्हिडिओच्या शेवटी बिबट्याने सांबरावर झडप घातली, मात्र यात सांबर निसटून गेल्याचे चित्रीत झाले आहे.