चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील नेरी इथं खोदकाम करताना जमिनीत दोन शिवलिंग (Black And White Shivling Found) आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. ऐन श्रावण महिन्यात ही घटना घडल्यानं शिवभक्तांची तिथं झुंबड उडाली. त्यातूनही एक काळं आणि दुसरं पांढरं शिवलिंग असल्यानं याचा नेमका अर्थ काय, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. मात्र हे शिवलिंग अठराव्या शतकातील असावं, असा प्राथमिक अंदाज इतिहास अभ्यासकांनी वर्तवला आहे. भोसलेशाही दरम्यान या परिसरात अनेक शिवमंदिरं Shiv Temple होती. त्याचाच एक भाग म्हणून ही शिवलिंगं असायला हवी, असा अंदाज ज्येष्ठ पुरातत्व विशेषज्ञ तसेच इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
असं दिसून आले शिवलिंग : चिमूर तालुक्यातील नेरी या गावात हेमांडपंथी पार्वतीमातेचं मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्रौत्सव साजरा होतो. वर्षभरही भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. त्यामुळे या ठिकाणी सभागृहाची भाविकांची मागणी होती. आमदार निधीतून सभागृह मंजूर करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी कॉलमकरीता खड्ड्याचं खोदकाम करण्यात आलं, परंतु पुरात्व विभागानं या ठिकाणी खोदकाम करण्यास मनाई केल्यानं खोदलेले खड्डे बुधवारी जेसीबीद्वारे बुजवण्यात येत असताना दोन मोठ्या मूर्ती प्रमाणं मोठमोठी दगडं दिसून आली. त्यांची पाहणी केली असता, शिवलिंग असल्याचं आढळून आलं. मूर्त्यांची माती काढल्यावर हे दोन्ही शिवलिंग असल्याचं स्पष्ट झालं.
प्राचीन शिवमंदिर परिसरातील नवसाचं शिवलिंग : नेरी इथं 13 व्या शतकात भव्य असं शिवमंदिर होतं. पूर्वी शिवमंदिरात भाविक नवस बोलायला यायचे. त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यास ते शिवलिंग तयार करून मंदिर परिसरात दान द्यायचे. याचाच एक भाग म्हणून प्राचीन शिवमंदिरात गेल्यास त्या परिसरात अनेक शिवलिंग आढळणं, ही सामान्य बाब आहे. त्याचाच एक भाग म्हणून नेरी येथील भव्य हेमाडपंथी मंदिराच्या परिसरातील ही शिवलिंग असावेत असं अशोकसिंग ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
काळ्या पांढऱ्या शिवलिंगाचा उलगडा : काळ्या शिवलिंगाच्या बाजूला पांढरं शिवलिंग असल्यानं अनेकांसाठी हा कुतूहलाचा विषय होता. मात्र याला स्थानिक कारण जबाबदार आहे. कारण याच परिसरात पांढरा दगड हा भटाळा गावात आढळून येतो तर काळा दगड हा नंदोरी गावच्या परिसरात दिसतो. या दोन्ही गावांचं अंतर हे नेरी गावापासून काही किलोमीटर आहे. त्यामुळे भाविक याच दगडांचा उपयोग करून शिवलिंग तयार करून अर्पण करत होते, अशी माहिती अशोकसिंग ठाकूर यांनी दिली.
हेही वाचा :