चंद्रपूर - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी धोरणाची अंमलबजावणी अद्यापही महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली नाही. याविरोधात आज भाजपच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होणार असून, आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्यांना स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी हमीभाव कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या कृषी सुधारणा कायद्यामुळे शेतकऱयांना खऱया अर्थाने स्वातंत्र्य मिळणार आहे. मात्र, शेतकऱयांबाबत महाविकास आघाडी सरकारने पुतण्या मावशीचे प्रेम दाखवत या कृषी विषयक कायद्याला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती त्वरीत उठवावी व राज्यात केंद्राच्या या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हे निषेध आंदोलन करण्यात आले.
गांधी चौक चंद्रपूर येथे भाजप महानगर शाखेतर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्यासह भाजप नेते राजेंद्र गांधी, प्रकाश धारणे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपा गटनेते वसंत देशमुख, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, मनपा सदस्य सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, माया उईके, देवानंद वाढई, राजेंद्र अडपेवार, शितल कुळमेथे, ज्योती गेडाम, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 'किसानों के सन्मान में मोदी सरकार मैदान में', 'स्थगिती रद्द करा शेतकऱयांना न्याय द्या', 'महाविकास आघाडीचे पुतण्या मावशीचे प्रेम', 'कृषी विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करा', 'महाविकास आघाडी नव्हे तर महाबिघाडी' अशा घोषणांचे फलक हाती घेत राज्य सरकारचा निषेध केला. आंदोलनानंतर डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना सादर केले. आंदोलकांच्या भावना शासनापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी शिष्टमंडळाला दिले.