चंद्रपूर - काँग्रेस पक्ष सध्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत पक्षाने दिलेली जबाबदारी अत्यंत मोठी आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या गटनेतेपदी निवड झाल्यावर वडेट्टीवार यांनी ईटीव्हीला पहिली प्रतिक्रिया दिली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर विधानसभेच्या गटनेतेपदासाठी उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले. आणि पक्षाच्या विधानसभेच्या गटनेतेपदी म्हणून वडेट्टीवार यांचे नाव जाहीर करण्यात आले.
सध्या ते आपल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा दौरा करीत आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघा काही महिन्यांचा वेळ उरला आहे. अशावेळी वडेट्टीवार यांना गटनेतेपद दिल्यामुळे त्यांच्यासामोर आपली छाप टाकण्याचे मोठे आवाहन आहे. भाजप शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, नेत्यांचा भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या मुद्यांवर आम्ही सरकारला भंडावून सोडू, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.