चंद्रपूर - आज पहाटे चंद्रपूर शहरातील मध्यभागी एक अस्वल शिरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभाग आणि स्वंयसेवी संस्थाच्या प्रयत्नानंतर अस्वलाला पकडण्यात आले.
चंद्रपूर शहराला लागून जंगल आहे. पाणी, भक्ष्य किंवा अन्य कारणामुळे वन्यप्राणी अनेकदा शहरात येतात. यात वाघ, अस्वल, बिबट्याचा समावेश आहे. आज सकाळी बालाजी वॉर्डात काही लोकांना अस्वल असल्याचे दिसून आले. या परिसराला लागूनच इराई नदी आहे. तिथे सांडपाणी सोडणार मोठा नाला हा बालाजी वॉर्डातून जातो. रात्री कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे नाल्याच्या वाटेने हे अस्वल शहरात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबतची सूचना वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह इको प्रो आणि हॅबीटॅट कॉन्सरवेशन सोसायटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. अस्वलाला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या गदारोळामुळे भीतीने अस्वल एका झुडुपात जाऊन लपले होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या गर्दीमुळे अस्वलाला पकडणे जोखमीचे होते. सावधानीसाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नानंतर अस्वलाला डार्ट मारण्यात आला आणि त्याला सुरक्षितरित्या पकडण्यात आले.