राजूरा (चंद्रपूर) - कोरोनाबाबत समाजात टोकाचे गैरसमज पसरले असताना तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. प्रशासनाच्या हाकेला प्रतिसाद देत कोरोना आजारातून नुकतेच बरे झालेले राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक राव पुढे आले असून त्यांनी स्वतःला कोविडमुक्त अभियानामध्ये झोकून दिले आहे. नागरिकांचाही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अशोक राव यांनी काही दिवस आधी स्वत:ची कोरोना तपासणी करून घेतली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सतरा दिवस गृह अलगीकरणात राहून त्यांनी उपचार घेतले. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी स्वतःला कोविडमुक्त अभियानामध्ये झोकून दिले आहे. ते घरोघरी जावून नागरिकांना स्वत:चे अनुभव सांगत तपासणी करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. समाजात कोरोनाबाबत असलेले टोकाचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यापूर्वी टाळेबंदीमध्ये अडकलेल्या सर्वसामान्यासाठी अशोक राव धावून गेले होते. मजूर, गरीबांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. महसूल विभागने त्यांचा या कार्याची दखल घेत प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविले होते. अशोक राव यांची कोविड जनजागृती अनेकांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे.