चंद्रपूर: अर्थात हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर असून यासाठी बफर क्षेत्रातील सितारामपेठ या गावाची निवड करण्यात आली आहे. ही प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. या यंत्रणेच्या मदतीने गावाच्या सभोवताल जर वाघ आणि बिबट आले तर त्याची अचूक ओळख करून याबाबतची माहिती गावकऱ्यांना त्वरित मिळणार आहे.
तृणभक्षी प्राण्यांपासून पिकांची हाणी: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढली आहे. पण त्यामानाने जंगलाचे क्षेत्रफळ कमी पडत आहेत. त्यामुळे जंगलाच्या आजूबाजूला वाघ-बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. तर जंगलावर निर्भर गावकऱ्यांना देखील जंगलातील परिसरात ये-जा करावी लागते. विशेषत: गुरा-ढोरांना चरविण्यासाठी जंगलालगतच्या परिसरात अनेकांना जावे लागते. यात मानव वन्यजीव संघर्षाच्या अनेक घटना घडतात. यानंतर वनविभागाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तर यात बरेचदा शेतीचा पिकाच्या नुकसान करणाऱ्या तृणभक्षी प्राण्यांपासून आपल्या पिकाचा बचाव करण्यासाठी काही शेतकरी आपल्या शेताच्या बाजूला जिवंत विद्युत तारा सोडून कुंपण करतात. यात बरेचदा वाघ किंवा बिबट्याचा मृत्यू होतो.
देशाचे या प्रयोगाकडे लक्ष: या घटना चंद्रपूर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे ही आकडेवारी कमी करण्याचे मोठे आव्हान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वनविभाग समोर उभे ठाकले आहे. त्यातच आता एक नवा पर्याय म्हणून गावकऱ्यांना वाघ आणि बिबटा पासून सावधान करण्यासाठी म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या यंत्रणेचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार आहे. देहरादून येथील एका कंपनीकडून हा प्रयोग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आजवर कुठल्याही राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या प्रयोगाकडे लक्ष लागलेले आहे.
अशी काम करेल प्रणाली? सध्याच्या स्थितीत सैन्यदल, सुरक्षा यंत्रणा, सीमावरती भागामध्ये त्याचा उपयोग केला जातो. मात्र पहिल्यांदाच व्याघ्र प्रकल्पामध्ये याचा उपयोग केला जाणार आहे. यासाठी ताडोबा क्षेत्रातील सितारामपेठ या गावाची निवड करण्यात आली आहे. या गावाच्या सभोवताल कॅमेऱ्याचे जाळे पसरवण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच जंगलाच्या लगत सीमेवर देखील असे कॅमेरे लावण्यात येणार आहे. हे कॅमेरे वाघ आणि बिबट्याचे अचूक मूल्यांकन करून तशी माहिती थेट वनविभाग यांना देणार आहे. त्यासाठी सर्वर देखील उपलब्ध करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे केवळ वाघ आणि बिबट्या याचीच सूचना या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होणार आहे अन्य तृणभक्षी प्राणी असल्यास ते या यंत्रणेत येणार नाहीत. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत मिळणार आहे तसेच हा प्रयोग यशस्वी झाल्यास याचा व्यापक पद्धतीने भारतभरातील राष्ट्रीय व्याघ्रप्रकल्पात देखील उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांचे लक्ष या प्रयोगाकडे लागलेले आहे.