चंद्रपूर - एकवीसाव्या शतकात अजूनही इंधन म्हणून लाकडांचा ( Branch from cow dung in chandrapur ) उपयोग केला जातो, चुलीवरचे जेवण अजूनही आपण आवडीने खातो. तर अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लाकडांचा ( Anupam Bhagat made branch from cow dung ) उपयोग केला जातो. या सर्व गोष्टींसाठी लागते ते लाकूड. मात्र, एका उद्योगी व्यक्तीने यावर एक अभिनव पर्याय शोधला आहे. लाकडासारखे दिसणारे आणि तितकीच जळाऊ क्षमता असलेले ओंडके त्यांनी शेणापासून तयार केले आहे.
हेही वाचा - Plastic Waste Free City : आता प्लास्टिकचा कचरा जाळीत अडकणार; चंद्रपूरच्या स्वच्छतेसाठी जेसीआय सरसावले
विशेष म्हणजे लाकडापेक्षा ते स्वस्त असून यामुळे झाडांची होणारी कत्तल देखील कमी होण्यास मदत होणार आहे. अनुपम भगत यांनी हे ओंडके तयार करण्याचे काम सुरू केले असून, लोकांकडून त्यांच्या या पर्यायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ शेणापासून ओंडके तयार न करता ती तयार कारण्याची मशीन सुद्धा बनविली आहे. त्यामुळे ही मशीन घेऊन कुणीही अशाप्रकारे ओंडके सहज बनवू शकतात.
गाई-म्हशीचे शेण अगदी सहज उपलब्ध होते, मात्र बहुदा त्याचा उपयोग खत म्हणून केला जातो किंवा त्याच्या गोवऱ्या करून इंधन म्हणून वापरले जाते. अन्यथा ते गावाकुसाबाहेर फेकून दिले जाते. मात्र, त्याचा व्यापक पद्धतीने उपयोग कधीच झाला नाही. तर, दुसऱ्या जागी जळाऊ लाकडाचा उपयोग अजूनही सर्रास केला जातो. मग तो उपयोग एखादा ढाबा, हॉटेल असो की, अंत्यसंस्कारासाठी त्यामुळे झाडांची कत्तल ही अपरिहार्य आहे. मात्र, अनुपम भगत यांनी तीन वर्षे सातत्याने केलेल्या प्रयोगाने जळाऊ लाकडाची क्षमता असलेले ओंडके तयार केले आहे. यासाठी त्यांनी यंत्र बनवले असून त्यात शेण आणि लाकडी भुसा टाकला की समोरून ओले ओंडके निघते. त्याला वाळवले तर हे ओंडके तयार होते. यावर्षी होळीच्या सणात त्यांनी तयार केलेल्या ओंडक्यांनी अनेक होळ्या पेटल्या.
लाकडापेक्षा स्वस्त शेणाचे ओंडके - जळाऊ लाकडाची सध्याची किंमत ही साधारण आठ ते नऊ रुपये किलो आहे. मात्र, शेणापासून तयार करण्यात आलेले ओंडके पाच ते सहा रुपये किलो पडते. त्यामुळे यात पैशांची बचत होते. मोठे हॉटेल किंवा ढाब्यावर जेवण तयार करण्यासाठी लाकडाचा उपयोग होतो, त्याजागी या ओंडक्यांचा उपयोग केला जात आहे. अंत्यसंस्कारासाठी देखील या ओंडक्याचा चांगला उपायोग केला जाऊ शकतो.
फक्त ओंडकेच नाही तर शेणापासून अनेक वस्तू - अनुपम भगत यांनी शेणापासून फक्त ओंडकेच नाही, तर अनेक कलात्मक वस्तू तयार केल्या आहेत. होम, हवन, यज्ञ करण्यासाठी त्यांनी शेणात यज्ञासाठी वापर होणाऱ्या वस्तू त्यात टाकून ते तयार केले आहे. असेच दिवाळीसाठीचे दिवे, कुंड्या, साबण अशा अनेक वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत.