चंद्रपूर - महानगरपालिकेत कचरा घोटाळा गाजत आहे. कचरा संकलन व वाहतुकीची निविदा मंजूर करताना 800 रुपये प्रति टन अधिकचे दर मंजूर करण्यात आले आहेत. या निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षांनी केलेला आहे. तसेच अनेक नगरसेवकांनी सुद्धा याबाबत आवाज उठवला आहे. नगरसेवक तसेच शहर विकास आघाडीचे गटनेता पप्पू देशमुख यांनी आज याबाबत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पुराव्यानिशी तक्रार केली आहे.
दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
महानगरपालिकेत मागील तीन वर्षांमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झालेले असून, या सर्व घोटाळ्यांबद्दल पप्पू देशमुख यांनी नगरविकास मंत्र्यांना सविस्त माहिती दिली. सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आणि महापालिकेतील अधिकारी हे संगनमत करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपीही त्यांनी यावेळी केला. कोविड-१९ आपत्तीमुळे महानगर पालिकेची आर्थिक स्थिती गंभीर झालेली असताना देखील, अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च करण्यात येत आहे. अनेक निविदा प्रक्रिया या कंत्राटदारांच्या लाभासाठी राबविण्यात येत आहेत. या घोटाळ्यांमुळे मनपाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी संगनमत व पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करीत असल्यामुळे, सामान्य जनतेच्या पैशाचा दुरुपयोग होत आहे. सर्व घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून, दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेचे आयोजन
कचरा घोटाळा व महानगरपालिकेतील आजपर्यंतचे इतर घोटाळे याबाबत आतापर्यंत केलेला पाठपुरावा, तसेच यापुढील भूमिका याबाबतची माहिती देण्यासाठी नगरसेवक पप्पू देशमुख हे सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान या बैठकीला विरोधी पक्षातील अनेक नगरसेवक उपस्थित राहाण्याची शक्यता आहे.