चंद्रपूर - शासनाच्या निर्देशानुसार प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ट्रॅव्हल्स मालक या नियमांना डावलून प्रवासी वाहतूक करीत आहेत. यावर आता उपप्रादेशिक परीवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. डीएनआर ट्रॅव्हल्स नंतर आज केजीएन ट्रॅव्हल्सवर अशी कारवाई करण्यात आली. टेस्ट करण्याची कुठलीही कल्पना ट्रॅव्हल्सवाल्याने प्रवाशांना दिली नव्हती, त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाने यावर कारवाई तर केलीच सोबत सर्व प्रवाशांच्या अँटिजेन टेस्ट करण्याचा खर्च ट्रॅव्हल्सवाल्याला भरून द्यावा लागला.
हेही वाचा - दिलादायक! चंद्रपुरात 24 तासात 1160 जणांनी केली कोरोनावर मात
संपूर्ण राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे, त्यामुळे प्रवासी वाहतूक देखील ठप्प आहे. मात्र, आपात्कालीन स्थितीत लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही निवडक प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, यासाठी प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोहचल्यावर तेथील केंद्रात जाऊन अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक आहे. तशी कल्पना संबंधित ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवाशांना देणे गरजेचे आहे. मात्र, तशी कुठलीही कल्पना न देता काही ट्रॅव्हल्स प्रवाशांची नेआण करीत आहेत. यामुळे कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. वरून हे ट्रॅव्हल्स चालक प्रवाशांकडून दुप्पट किंमत वसूल करीत आहेत. यावर आता उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
असाच प्रकार मंगळवारी निदर्शनास आला असता डीएनआर ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली. तर, आज सकाळी नागपूर-चंद्रपूर प्रवास करणाऱ्या केजीएन ट्रॅव्हल्सवर ही कारवाई करण्यात आली. एम-४०-एटी-०९१६ ह्या क्रमांकाची ट्रॅव्हल्स कारवाई पथकाने पडोलीजवळ थांबवली. विचारणा केली असता अशी कुठलीही कल्पना प्रवाशांना दिली नसल्याचे समोर आले. मग काय, प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स थेट क्राईस्ट हॉस्पिटल येथील अँटिजेन केंद्रासमोर ऊभी करण्यात आली. यावेळी सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आली आणि याचा सर्व खर्च ट्रॅव्हल्स मालकाला द्यावा लागला. सोबत नियम मोडले म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत 10 हजार रुपयांसोबत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्गदर्शनात मोटर वाहन निरीक्षक श्रीनिवास जेल्लावार,
मनीष मडके यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - काँग्रेसमधली धुसफूस चव्हाट्यावर.. मानापमानाच्या नाट्यावर आमदारांनी केला वॉकआउट