चंद्रपूर- सिमेंट कंपनीने हडपलेली जमीन परत मिळवण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिवती तालुक्यातील कुसुंबी येथील या व्यक्तीने आपली जमीन मिळवण्यासाठी शासन दरबारी खेटे घातले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही. प्रकृती खालावल्याने काल त्याचा मृत्यू झाला. देवू कुळमेथे, असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
जिवती तालुका हा आदिवासी बहुल प्रदेश आहे. जिवतीसोबतच अनेक आदिवासी बांधवांची जमीन कोरपना, राजुरा तालुक्यातही आहे. या तालुक्यातील आदिवासी बांधवांची जमीन माणिकगड सिमेंट कंपनीने बळकावली असल्याचा आरोप जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. या साठी तालुक्यातील आदिवासी लोकांकडून न्यायिक लढा सुरू आहे. अशातच या लढ्यात सहभागी झालेल्या कुसुंबी गावातील देवू कुळमेथे यांचा मृत्यू झाला आहे. देवू यांच्या कुटुंबाचे पोट शेतीवर अवलंबून आहे. त्यांची जिवती आणि राजुरा तालुक्यात जमीन आहे. हडपलेली जमीन परत मिळवण्यासाठी देवू यांनी आंदोलन केले, उपोषन केले, न्यायालयही गाठले. मात्र, काही मिळाले नाही.
दरम्यान, देवू यांना जमीन मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता आबिद अली यांची साथ लाभली. मात्र, अन्यायाविरुद्ध लढा देताना देवू यांचे शरीर थकले आणि ते आथरुणावर खिळले. देवू यांच्यावर उपचार करण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. म्हणून त्यांच्या कुटुंबाने उपविभागीय कार्यालयापुढे भिक मागो आंदोलन केले. पोलिसांनी कुळमेथे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. उपचाराला शरीर साथ देत नव्हते, म्हणून कुटुंबानी देवू यांना गावाकडे आणले. पण, परत येताना देवू यांनी पोलीस ठाण्यापुढे रुग्णवाहिका उभी केली आणि मी मेलो तर माझ्या मृत्यूला माणिकगड कंपनी जबाबदार असणार, अशी तक्रार दाखल केली. त्यानंतर कुळमेथे यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. जाताना त्यांचे हात रिकामे होते. आपली जमीन मिळविण्यासाठी अशा अनेक 'देवू' चा संघर्ष अद्याप सुरूच आहे. रिकाम्या हाताने पुन्हा किती देवू देवाघरी जाणार? हा प्रश्न आहे.
हेही वाचा- चंद्रपुरात तस्करांना उत; सलग तिसऱ्या दिवशी केलेल्या कारवाईत अडीच लाखांची दारू जप्त