राजूरा (चंद्रपूर) - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येथील एका 80 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. त्या गोंडपिपरी शहरातील व्यापारी मनोज नरहरशेट्टीवार आई आहेत. कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी सणावारासारखे फटाक्यांची आतीषबाजी करत, हार घालून आजीबाईंचे स्वागत केले.
गोंडपिपरी येथील शशिकला नरहरशेट्टीवार या 80 वर्षीय आजीबाईंची तब्येत अचानक बिघडली. तपासणीअंती त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनीही स्वतःची कोरोना तपासणी केली. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, आईला कोरोनाची लागण झाल्याने नरहरशेट्टीवार कुटुंबीय घाबरले होते. या चिंतेत कुटुंबीय असतांना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर 80 वर्षीय आजींनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.
त्या सुखरुप घरी परतल्या. त्यांनी कोरोनावर मात केल्याने कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलगा, सून आणि नातवंडानी घरासमोर फटाके फोडले. त्यांची आरती ओवाळली. शेजारच्यांना मिठाई वितरित केली. यावेळी मुलगा मनोज नरहरशेट्टीवार, सुन माधुरी नरहरशेट्टीवार, नातवंड मंदार नरहरशेट्टीवार, मधुर नरशेट्टीवार हे कुटुंबीय उपस्थित होते. नरहरशेट्टीवार कुटुंबियांच्या आनंदोत्सवाची सद्या गोंडपिपरीसह परिसरात चर्चा आहे.