चंद्रपूर- कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ चिमूर येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तरुणांसोबत एका ७३ वर्षाच्या व्यक्तीने सहभाग नोंदवला होता. केवळ सहभाग नाही तर, चक्क १० किलोमीटरचे अंतर धावत त्यांनी पार केले. डोमा चाफले, असे त्या ७३ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्यांच्या या उत्साहामुळे तरुणांनाही तोंडात बोटं घालायला भाग पाडले आहे.
७३ वर्षीय स्पर्धक धावला
'आपले आरोग्य आपल्या हाती' आणि 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या तत्वाला अनुसरून चिमूर येथे कोरोना योद्धांच्या सन्मानार्थ भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर तालुक्यासह नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा येथील ७०० ते ८०० शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतला. तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. मात्र, या सहभागी तरुणांपेक्षा एक वेगळीच व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ते म्हणजे ७३ वर्षीय डोमा चाफले. निवृत्तीपासूनच त्यांना पळण्याचा छंद लागला आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला ते देतात. डोमा चाफले जरी या स्पर्धेत पहिले आले नसले तरी सगळ्यांचा आकर्षणाचा ते केंद्रबिंदू ठरले. त्यांच्यासोबत ६५ वर्षीय हिरामन बारसागडे तर आठ वर्षाचा रोशन ठाकरे आणि ९ वर्षाचा दिव्यांग दुर्गे हेसुद्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वाटप
या मॅरेथॉन स्पर्धेत मुलांमधून नागपूरचा लिलाराम बावणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक नागपूरच्याच शादाब पठाण याने पटकावला. तिसरा क्रमांक भंडारा येथील रितीक पंचबुद्धे याने पटकावला. मुलींमध्ये नागपूरच्या श्रेया संजय किरमोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर, तेजस्वीनी नरेंद्र लांबकाटे यांनी दुसरा क्रमांक तर तिसरा क्रमांक आस्था हेमंत निबांळकर यांनी पटकाला. सर्व विजेत्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्र देण्यात आले.