चंद्रपूर - अन्न व औषध विभागाने प्रतिबंधीत तंबाखू विक्रेते आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे. गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवाईत तब्बल 22 लाखांचा साठा जप्त केला. सुगंधीत तंबाखू, पानमसाला अशा वस्तूंवर राज्यात बंदी आहे. असे असतानाही याची छुप्या पद्धतीने विक्री जोमात सुरू आहे. यात अनेक विक्रेते गब्बर झाले आहेत. याविरोधात आता अन्न व औषध विभागाने कंबर कसली आहे.
21 मार्च ते 20 मे या कालावधीत एकूण 153 आस्थापनांची तपासणी केली असता त्यापैकी 17 आस्थापना या प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्याकडून 41 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. त्याची किंमत 22 लाख 59 हजार 509 एवढी आहे. संबंधीत प्रतिबंधित अन्नपदार्थांची चोरटी वाहतूक करणारे 6 वाहनेही अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाणे येथे पुढील तपासासाठी प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला आहे.
अहवाल प्राप्त होताच दोषीवर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यापैकी मासे विक्रेत्यांवर एकूण 1 हजार 200 रुपये किमतीचे मासे नष्ट करण्यात आले तर राजधानी ट्रेड लींक, बल्लारपूर ट्रेडिंग कंपनी, चंद्रपूर यांच्याकडून खजुराचा नमुना घेऊन उर्वरित 34 किलो साठ जप्त करण्यात आला. 19 मे रोजी आनंद किराणा स्टोअर्स, मेहता कॉम्प्लेक्स येथील गोडाऊनमधून दोन लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला. तर आज 20 मे रोजी केलेल्या कारवाईत रेहमत नगर येथे एकाच्या घरात धाड टाकली असता, एक लाखाची सुगंधित तंबाखु जप्त करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.