चंद्रपूर - पोटाची खळगी भरण्यासाठी तेलंगणामध्ये शेतमजुरी करण्यासाठी गेलेल्या काही मजुरांना आता जीवन-मरणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीमुळे हे मजूर आहे तिथेच अडकले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश असून कोरोनाच्या भीतीने शेतात अडकलेल्या मजुरांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतात असेलेल्या एका ताडपत्रीखाली या 20 मजुरांना आलेला दिवस काढावा लागत आहे.
जिल्ह्यातील शेतमजूर रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जात असतात. असेच सिंदेवाही तालुक्यातील 20 शेतमजूर फेब्रुवारी महिन्यात तेलंगणा राज्यातील कोठागुडम जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. अशातच कोरोनाचे संकट देशावर ओढवले आणि अनेक राज्यात संचारबंदी लागली. त्यामुळे हे शेतमजूर त्याच गावात अडकले. गावात जावे तर गावातील लोक मज्जाव करतात. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत तेव्हा तुम्ही इथे येऊ नका, असे ते म्हणतात. शेतात खायला अन्न नाही. शेताचा मालक म्हणतो मी धान्य देतो. पण, त्यानेही धान्याचा पैसा मजुरीतून कापण्याची अट घातली. अशावेळी घरी आपल्या कुटुंबाला पैसा तरी कसा घेऊन जायचा, असा पेच या मजुरांसमोर आहे. विशेष म्हणजे यात 13 महिला आहेत. या मजुरांनी कसाबसा आम आदमी पक्षाच्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्याशी संपर्क साधत सर्व हकीकत सांगितली. याबाबत गोस्वामी यांनी ही माहिती स्थानिक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांना सांगितली. मात्र, त्यांचा कोठागुडम जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही.