चंद्रपूर - वरोरा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे तिकीट मिळविण्यासाठी १४ इच्छुकांनी मुलाखत दिली. यामध्ये डॉ. आसावरी देवतळे आणि काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा समावेश आहे. या दोन्ही उमेदवारांना अन्य इच्छुक उमेदवारांनी विरोध दर्शवला आहे. याबाबतचे पत्र पक्षश्रेष्ठींना देण्यात आले आहे.
३१ जुलै रोजी जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या मुलाखती झाल्या. निवड समितीमध्ये आमदार वीरेंद्र जगताप, किशोर गजभिये, शकूर नागाणी यांचा समावेश आहे. जिल्हा निवड समितीत नंदू नगरकर, सुभाष धोटे, प्रकाश देवतळे, सतीश वारजूरकर, महेश मेंढे, घनश्याम मुलचंदानी, हरीश कोतावार, आसावरी देवतळे, पवन आगदारी, मलिक शाकिर यांचा समावेश आहे. या समितीसमोर वरोरा विधानसभा क्षेत्रासाठी १४ जणांनी मुलाखती दिल्या. यामध्ये प्रकाश मुठाळ, विठ्ठल टाले, प्रकाश शिंदे, भावना वानखेडे, छोटुभाई शेख, डॉ. खापणे, डॉ. आसावरी देवतळे, विजय देवतळे, देवराव घाटे, प्रतिभा धानोरकर, मोहन डोंगरे, दिनेश चोखारे, सुनंदा जीवतोडे आणि अन्य एकाचा समावेश आहे. या मुलाखतीदरम्यान अन्य इच्छुक उमेदवारांनी डॉ. आसावरी देवतळे आणि प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.
याबाबतचे पत्र पक्षश्रेष्ठींना देण्यात आले आहे. डॉ. आसावरी देवतळे यांना २०१४ च्या विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सेनेत असलेले बाळू धानोरकर यांनी त्यांना पराभूत केले होते. आता धानोरकर हे काँग्रेसमध्ये आहेत. राज्यातून निवडून आलेले काँग्रेसचे ते एकमेव खासदार आहेत. त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी देखील वरोरा विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला आहे. एकाच घरी दोन उमेदवार नकोत या भावनेतून इच्छुक उमेदवारांनी प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.
यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघातून त्यांना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणाऱ्या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात, यावी अशी मागणी आहे. विरोध डावलून जर पक्षाने देवतळे किंवा धानोरकर यांना उमेदवारी दिल्यास काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वरोरा विधानसभेसाठी पक्षश्रेष्ठी नेमकी कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.