मुंबई - राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी मैदानात शड्डू ठोकत आहे. तर, आता समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनेही राज्यात सर्व जागा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. समाजवादी आणि बसपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज याबाबतची घोषणा करण्यात आली.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि बहुजन समाज पार्टीचे खासदार अशोक सिद्धार्थ यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. राज्यातल्या ४८ जागांवर सपा आणि बसपा आपले उमेदवार देणार असून लवकरच उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. देशात जातीय राजकारण करून अस्थिरता माजवणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी सपा आणि बसपा एकत्र आली आहे. तसेच भाजप आणि काँग्रेस या पक्षांना आमच्या युतीने समान अंतरावर ठेवले असल्याचेही सिद्धार्थ म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी नेहमी आम्हीच बलिदान का द्यायचे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.भाजपला रोखण्याची ताकद काँग्रेसमध्ये नसून सपा आणि बसपामध्येच असल्याचे अबू आझमी यांनी यावेळी सांगितले. उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सपा आणि बसपा एकत्र असताना काँग्रेसने उमेदवार दिले होते, याची आठवण आझमींनी यावेळी करून दिली.
काँग्रेस पक्षाने नेहमी बहुजनांची मते घेतली,पण त्यांना कधीही सन्मान दिला नाही. त्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबीतच ठेवले, दलितांना आणि मुस्लिमांना भीती दाखवून मते मिळवली. मात्र, आता तसे होणार नाही, असे अबू आझमी यांनी सांगितले.