मुंबई- गोरेगावमध्ये घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षांचा चिमुकला वाहून गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. यावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधितावर कठोर कारवाई करायली हवी, तेव्हाच निष्काळजीपणे काम करणाऱ्यांना धडा मिळेल आणि पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईच्या गोरेगाव परिसरात खुल्या गटारीत पडून चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली. दिव्यांशू असे या मुलाचे नाव असून ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बीएमसीचे पथक या ठिकाणी पोहोचले. रात्रभर या मुलाचा शोध घेण्यात आला मात्र या घटनेला १३ तास उलटून गेले तरी अद्याप चिमुकल्याचा शोध लागू शकलेला नाही.
कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर आणि कामगार लोक मॅन होल तोडून घेऊन जातात. त्यांचे कामाकडे लक्ष्य नसते. मात्र, याच्यामुळे सामान्य नागरिकाचा बळी जात आहे. त्यामुळे दोषींवर लवकरात लवकर मोठी कडक कारवाई झाली पाहिजे तरच अशा दुर्घटना रोखता येऊ शकतात. पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावे, असे सोमय्या म्हणाले आहेत.
निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांचा बळी जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना घडतात याला जबाबदार कोण असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.