मुंबई - लोकसभा निवडणुकीत आघाडीतील काही घटकपक्षांनी ऐनवेळी म्हणावी तशी मदत केली नाही, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांसमोर लावला. त्यामुळे नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर आदी जिल्ह्यात आघाडी करून किती जागा राष्ट्रवादीला येतील हे निश्चित करा, अशी थेट मागणी त्यांनी पवार यांच्यासमोर केली. या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यासाठी पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना स्वतंत्ररित्या बोलून त्याविषयी माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील बेलॉर्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हानिहाय मॅरेथॉन बैठका गुरुवारपासून सुरू आहेत. त्याचा दुसरा टप्पा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत या बैठकांमध्ये राज्यातील जिल्हयांचा आढावा घेण्यात आला. नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर आदी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर जागांची माहिती कळू द्या, अशी मागणी लावून धरली होती.
या नेत्यांनी बैठकीला लावली हजेरी-
बैठकीत नाशिक शहर तसेच ग्रामीण, मालेगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील लेखाजोखा शरद पवारांसमोर मांडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील उपस्थित राहिले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार वैभव पिचड, आमदार नरहरी झिरवळ आदी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.