मुंबई - शहरात १९९४ पासून आतापर्यंत जवळपास ४० दरोडे टाकणाऱ्या 'चुहा' आरोपीला मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने अटक केली आहे. केवळ ४१ किलो वजन आणि ५ फूट ४ इंच उंचीमुळे मुंबई पोलिसांच्या यादीत मोहम्मद जाफर करीम शेख या आरोपीला 'चुहा' म्हणून ओळखले जाते.
मुंबईतील फुटपाथवर राहणारा 'चुहा' आरोपी दक्षिण मुंबईत सर्वात जास्त घरफोडी करत होता. एखादे दुकान फोडायचा असेल तर त्या दुकानासमोर तब्बल ३-४ दिवसरात्रीच्या वेळेस हा आरोपी झोपायचा. यादरम्यान, दुकानाला कुठले कुलुप लावले आहे. ते कसे तोडता येईल, त्याला किती वेळ लागेल. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर चुहा आरोपी दुकानाचे शटर अवघ्या ३ मिनिटात तोडून उंदरासारखा दुकानात शिरायचा आणि दुकानातील मिळेल ते सामान चोरी करायचा. चोरीचे सामान तो चोर बाजारात विकायचा. चोरीच्या पैशातून मुंबईतल्या हॉटेलांमध्ये आणि बिअर बारमध्ये मौजमजा करायचा.
दक्षिण मुंबईतील सोन्याच्या दुकानात झालेल्या चोरीच्या संदर्भात मुंबई पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आजूबाजूच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा 'चुहा' वावरताना पोलिसांना दिसून आला. 'चुहा'ला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केलेा आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.