मुंबई - शहरात गेल्या ५ दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा झाला नसल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य सरकारची सेवा चालू आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर, काही गाड्या रद्द केल्या आहेत, याची महामंडळाने दिली आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, सायन सर्कलजवळ पाणी आल्याने परळ बस स्थानकातून मुंबईच्या बाहेर जाणारी वाहतूक वडाळामार्गे सुरू आहे. दादर बस स्थानकातून सकाळपासून १३ फेऱ्या पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत. यामधील १० गाड्या शिवनेरी आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रेल्वेसेवा बंद असूनही या मार्गावर प्रवाशांची गर्दी नसल्याने गाड्यांची वारंवारता कमी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली-नागोठणे या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग सध्या एसटी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा आणि अर्नाळा आगारात सूर्या धरणातून सोडलेले पाणी साचल्याने सकाळपासून बस फेरी सुटलेली नाही.