मुंबई -महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय आज मराठी भाषा विभागाने घेतला. यात पुन्हा एकदा संघ विचारांच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणात वर्णी लावण्यात आली आहे. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी दिलीप करंबेळकर यांना कोणताही पर्याय न देता पुन्हा कायम करण्यात आले असून त्यासोबत मागील मंडळात असलेल्या अनेकांना बाहेर करून संघ विचारांशी एकनिष्ठ असलेल्यांना संधी देण्यात आली आहे.
ज्यांची कोणतीही भूमिका नाही अशा एका नाटककार आणि साहित्यिकालाही तोंडी लावण्यासाठी मंडळाच्या सदस्यपदी घेण्यात आले आहे. यामुळे मंडळात अध्यक्षासह 31 जणांचा समावेश झाला आहे.मंडळाच्या पुनर्रचनेत मुंबईतील ९ तर पुण्यातील ८ जणांचा समावेश आहे. लातूर, सोलापूर आणि नागपूरातील प्रत्येकी एक तर ठाण्यातील २ सदस्यांचा समावेश आहे.
राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर सरकारने 5 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना केली. त्यात संघविचारांच्या अनेकांना सदस्यपदी घेण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षांसह 23 सदस्यांची संख्या होती. त्यानंतर 5 जुलै 2016 रोजी साहित्यिका अरुणा ढेरे आणि दीपक घैसास यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले हेाते. आज करण्यात आलेल्या पुनर्रचनेत मागील सदस्यांपैकी साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आशा बगे, डॉ. अक्षयकुमार काळे, विवेक घळसासी, डॉ. गौरी माहुलीकर, अरूण फडके आदींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यातील काहींनी राजीनामे दिले होते तर डॉ. अक्षयकुमार काळे, अरुण फडके हे मंडळाच्या एकाही बैठकीला फिरकले नव्हते. विशेष म्हणजे पीएचडी प्रबंधासाठी वाङमय चौर्य केले म्हणून ठपका असलेल्या व मुंबई विद्यापीठात प्रकरण सुरू असलेल्या डॉ. निरज हातेकर यांना यावेळीही पुन्हा मंडळाच्या सदस्यपदी घेण्यात आले असून त्याविषयी मंत्रालयातील अधिकारीही अचंबित झाले आहेत.
नवीन सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेल्यांमध्ये अनेकजण संघ विचारांशी बांधिलकी जपणारे असून यात पुण्यातील भांडारकर संस्थेशी संबंधित असलेले डॉ श्रीनंद बापट, संघासाठी आयुष्य वेचलेले माजी न्यायाधिश दिनकर कांबळे, मंडळाचेच माजी कर्मचारी माधव चौंडे, होमी भाभाचे माजी संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान, शेतकरी संघटनेच्या नियतकालिकाचे प्रकाशक श्रीकांत उमरीकर, सिद्धाराम पाटील,डॉ. नामदेव मेश्राम तसेच राहुरी विद्यापीठातील माजी अधिष्ठाता व कोणतीही भूमिका नसलेले आणि संघाच्या विरोधात न जाणारे डॉ. भिमराव उल्मेक, डॉ.नागोराव कुंभार, डॉ. राजन गवस, सर्जेराव ठोंबरे, संतोष शेलार यांचीही वर्णी लावण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व साहित्यिका अरूणा ढेरे यांचीही मागील वर्षी वर्णी लावण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांनीच मोठी धडपड केली होती. तर यावेळी ज्या नवीन सदस्यांना घेण्यात आलेले त्याची यादीही अध्यक्षांनीच तयार केल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.