मुंबई - मागील लोकसभा निवडणुकीत जसा दक्षिण - मध्य मुंबईत भगवा फडकावला होता, अगदी तसाच आगामी लोकसभेत भगवा डौलाने फडकवणार असल्याचा विश्वास खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शेवाळे यानी केलेल्या विकास कामांच्या अहवालाचे रविवारी मातोश्रीवर ई-प्रकाशन झाले. यावेळी राहुल शेवाळे हे बोलत होते.
यावेळी बोलताना शेवाळे म्हणाले, की दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघ पवित्र असा आहे. या मतदार संघात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. शिवसेना भवन, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक असल्याने हा मतदार संघ भावनिक आणि प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे मला २०१४ ला उद्धव ठाकरे यांनी संधी दिली होती. त्या संधीचे सोने केले व आज पाच वर्षातील कामाचा अहवाल मी पक्षप्रमुखांच्यासमोर सादर केल्याचेही ते म्हणाले.
प्रत्येक शिवसैनिकाचे स्फूर्तिस्थान असलेल्या मातोश्री येथे पक्षप्रमुखांच्या हस्ते कार्यअहवालाचे प्रकाशन होणे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. या सोहळ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. मी २०१९ ला मध्य-दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवणार आहे, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांच्या समोर राहुल शेवाळे यांनी दिली.