मुंबई - विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आणि सरकार अनुदान देण्याच्या भूमिकेतच आहे. मात्र तांत्रिक अडचणी असल्याने अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली. दरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यम प्रतिनिधींना न बोलताच निघून गेले.
अनुदानित शाळांना अनुदान द्यायला पाहिजे, ही महापालिका आणि राज्य सरकारची भूमिका आहे. अनुदान देण्यासाठी शिक्षण मंत्री, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड तसेच शिक्षण संघटनाचे प्रतिनिधी यांची समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीमहाडेश्वर यांनी दिली.
तांत्रिक अडचण असल्याने शिक्षणमंत्र्यानी वेळ मागितला आहे. तसेच शाळांनी शिक्षकांना नोकरीवर ठेवताना रोस्टर पद्धत अवलंबली का त्याची तपासणी करण्यात येईल, असेही महाडेश्वर यांनी यावेळी सांगितले.
शिक्षक आंदोलन सुरूच राहणार. आजच्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री, महापौर, शिक्षण समिती अध्यक्ष यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन स्थगित केले. मात्र निर्णय होत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावरील आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.