मुंबई - भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे आमदार आगामी विधानसभेत शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत, असे संकेत शिवसेना सचिव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी दिले आहेत. लोकसभेत कोळंबकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला उघडपणे मदत केली होती. मात्र, काही शिवसैनिकांनी त्यांचा विरोध केला होता. पण, आता चित्र बदलले असून आगामी निवडणूक ते शिवसेनेकडून लढण्याची चिन्हे आहेत.
विधीमंडळाच्या मुख्यप्रवेशद्वारावर शिवसेना सचिव नार्वेकर आणि कालिदास कोळंबकर आनंदी देहबोलीत हस्तांदोलन करताना दिसले. तर नार्वेकर यांनी कालिदास कोळंबकर यांचा हात धरून हातात शिवबंधन बांधत असल्याचे दर्शवले. त्यामुळे शिवसेना आणि कोळंबकर यांच्यातली दरी कमी होताना दिसत आहे .
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सोबत २००५ साली कोळंबकर यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यांनतर ते काँग्रेसमध्ये असूनही केवळ राणे समर्थक आमदार म्हणूनच ओळखले जात होते. आता राणे यांनी काँग्रेससोडून स्वाभिमान पक्षाची स्वतंत्र चूल मांडली आहे. मात्र, स्वाभिमान पक्षात जाण्याचे स्वारस्य कोळंबकर यांनी दाखवले नाही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात जाण्याचे त्यांनी पसंत केले आहे. आगामी विधानसभेत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या वडाळा विधानसभेतून कोळंबकर निवडून येत आहेत, ती जागा शिवसेनेकडे असल्याने शिवसेना ती जागा कोळंबकर यांना सोडेल का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनेच शिवबंधन बांधण्याचे संकेत दिल्याने कोळंबकर यांचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आहेत.