मुंबई - भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा २ दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा त्यांचा कोणताही कार्यक्रम नाही. तसेच जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. लवकरच याला अंतिम रुप दिले जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (शनिवारी) दिली. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबई भाजप कार्यालयात प्रदेश समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी दरम्यान पाटील पत्रकारांशी बोलत होते.
नड्डा रविवारी महाराष्ट्र प्रदेश समितीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना नेस्को संकुलात भेटणार आहेत. त्यापूर्वी नड्डा चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर स्मारक तसेच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच त्यांचा हा दौरा असून नेस्को मैदानात ते राज्यातील ७ हजाराच्या आसपास कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. भाजपमध्ये येण्यास अनेक जण इच्छुक असून पुढच्या काही दिवसात अन्य पक्षातील लोक भाजपमध्ये येतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.