मुंबई - मुंबईत जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया (५१) यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील बहुमजली वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या ३० व्या मजल्यावरुन उडी मारून कपाडिया यांनी आपले जीवन संपवले. सोमवारी रात्री ही घटना घडली.
हरेंद्र कपाडिया जीएसटी अधीक्षक म्हणून काम पाहत होते. ८ महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांना ब्रेनस्ट्रोक आल्याने ६ महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २ महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांनी कार्यालयात जाण्यास सुरुवात केली होती.
कामावर असताना कपाडिया मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या संदर्भात पोलिसांनी कार्यालयातील सहकाऱ्यांचे जवाब नोंदविले असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आजारपणाला कंटाळून हरेंद्र कपाडिया यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.