मुंबई - घाटकोपरच्या अमृतनगर येथे सिंधुदुर्ग आणि सिंहगड या २ गृहनिर्माण संस्था आहेत. गेली १० वर्षे येथील रहिवाशी संक्रमण शिबिरात राहतात. अद्याप त्यांना घरे मिळालेली नाहीत. संक्रमण शिबिरात सोयीसुविधाही मिळत नाहीत. यामुळे रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर शेट्टी यांनी दिली.
घाटकोपर पश्चिम अमृतनगर येथील सिंहगड सोसायटीत १८७ आणि सिंधुदुर्ग सोसायटीत ११३ कुटुंब राहतात. १० वर्षांपूर्वी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सुरेश उर्फ तुकाराम पाटील आणि 'सतरा प्रॉपर्टी' यांनी विकासकाच्या माध्यमातून येथे एसआरए योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआरए योजना राबवता यावी म्हणून येथील झोपड्या तोडून संक्रमण शिबिरे बांधण्यात आली. गेली १० वर्षे संक्रमण शिबिरात येथील रहिवाशी राहत आहेत.
संक्रमण शिबिराची अवस्था दयनीय झाली आहे. खिडक्यांच्या काचा खाली कोसळत आहेत. पाईप गंजले असल्याने सांडपाणी परिसरात साचते. दुर्गंधीमुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील रहिवाशी आपल्या समस्या वेळोवेळी लोकप्रतिनिधी तसेच विकासकासमोर मांडत आले आहेत. त्यानंतरही खासदार किरीट सोमय्या, आमदार राम कदम आणि स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील दुर्लक्ष करत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे. येथील रहिवाशांना कोणीही न्याय देत नसल्याने तसेच गेल्या १० वर्षांत आम्हाला आमची घरे मिळाली नसल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
रहिवाशांचा आरोप असलेले शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते निवडणुकीच्या प्रचारासाठी कुडाळ येथे असल्याचे समजले. त्यांनी मोबाईलवर दिलेल्या माहितीनुसार याठिकाणी विमानतळ प्राधिकरणाची आवश्यकता आहे. ती परवानगी ७ वर्षांनी मिळाली आहे. नवीन विकास आराखडा मंजूर झाला आहे. नव्या डिसीआर नियमानुसार ३०० चौरस फुटांचे घर देण्यासाठी विकासकाने एसआरएकडे पत्रव्यवहार केला आहे. येत्या २ वर्षात येथील रहिवाशांना घरे दिली जातील. मी आधी विकासक संस्थेत डायरेक्टर होतो आता नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली.