मुंबई - सीएसएमटी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या दुर्घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार पूल विभागाने मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा नव्याने एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
स्ट्रक्चरल ऑडिटरने योग्य अहवाल दिला नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल पडला असे पालिकेच्या चौकशी अहवालातून समोर आले आहे. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार सीएसएमटी येथील पुलाचे ऑडिट करणाऱ्या कंपनीवर कारवाई करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत. सीएसएमटी पूल दुर्घटनेतून धडा घेतलेल्या महापालिकेने मुंबईच्या हद्दीमधील सर्वच पुलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम आणि पूर्व उपनगरातील पुलांचे ऑडिट करणाऱ्या कंपन्यांना पुन्हा नव्याने ऑडिट करण्याचे आदेश पूल विभागाने दिले आहेत.
मुंबई शहरातील ३९ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट डी. डी. देसाई यांनी, पश्चिम उपनगरातील १५७ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सी. व्ही. कांड कन्सल्टंट कंपनीने, तर पूर्व उपनगरातील ६६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट कंपनीने केले होते. सीएसटी येथील पूल पडल्याने शहर विभागातील कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू असल्याने या ठिकाणी लवकरच नव्याने कन्सलटंट नियुक्त केला जाणार आहे. या दरम्यान पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पुलांचे ऑडिट महिनाभरात करून सादर करण्याचे आदेश पालिकेच्या पूल विभागाने सी. व्ही. कांड कन्सल्टंट व स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट या कंपन्यांना दिले आहेत.
३९ पुलांचे ऑडिट रखडणार
सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेनंतर मुख्य अभियंता (दक्षता) विवेक मोरे यांनी आयुक्तांच्या आदेशाने चौकशी केली. पूल चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल देणारे स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये दिला होता. या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस देसाई यांनी केली होती. पुलांच्या ऑडिटमध्ये निष्काळजी व बेपर्वाई करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला. याकारणाने डी. डी. देसाई या स्ट्रक्चरल ऑडिटरला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे शहर विभागातील ३९ पुलांचे ऑडिट रखडणार आहे.