मुंबई - मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून 'सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय' या गाण्यातून आरजे मलिष्काने पालिकेला धारेवर धरले होते. यानंतर मुंबई पालिका पदाधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या रोषालाही ती सामोरी गेली होती. आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न होऊ शकतात. अशावेळी मलिष्का पुन्हा बरसू शकते. म्हणूनच 'रेड एफएम 93.5' फेम आरजे मलिष्का व त्यांच्या सहकाऱ्यांनाच पालिकेने त्यांची काम मुंबईकरांपर्यत पोहोचवण्यासाठी आज निमंत्रित केले होते.
![BMC invite RJ Malishka and team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/r-mh-mum-20june-malishka-jaya_20062019200054_2006f_1561041054_75.jpg)
यंदा पुन्हा पावसाळ्यात पालिकेला मुंबईतील खड्डे व इतर नागरी समस्यांवरून टीकेची धनी होण्यापासून वाचण्यासाठी पालिका आयुक्तांनी मलिष्कापुढे शरणागती पत्कारली आहे.
![BMC invite RJ Malishka and team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/r-mh-mum-20june-malishka-jaya_20062019200054_2006f_1561041054_189.jpg)
पालिका आयुक्तांनी आरजे मलिष्का व त्यांचे सहकारी तसेच मराठी सिने अभिनेते अजिंक्य देव यांना सोबत घेऊन वरळी येथील महापालिकेच्या लव्हाग्रोव्ह पंपीग स्टेशनला तसेच महापालिका मुख्यालयातील आपतकालीन नियंत्रण कक्षाची ओळख करून दिली.
यंदा पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यावर खड्डे न पडण्याचा व पाणी न तुंबण्याचा निर्धार पालिका आयुक्तांनी केला असून त्याकरीता कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत आयुक्तांनी मलिष्काला माहिती दिली.
![BMC invite RJ Malishka and team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/r-mh-mum-20june-malishka-jaya_20062019200054_2006f_1561041054_146.jpg)
या पाहणी भेटीनंतर मलिष्काने पालिकेसमोर लोटांगण घातले का ?असा सवाल उपस्थित केला जातोय.
महानगरपालिका मुंबईवासीयांना विविध नागरी सेवा सुविधा दर्जेदारपणे पुरविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असते. मात्र त्या कामांचे प्रतिबिंब मुंबईकरांपर्यंत दिसण्यासाठी प्रसार माध्यमे - सोशल मिडिया ही प्रसारमाध्यमे महत्वपूर्ण भूमिका बजावितात म्हणून त्यांनी अशी सर्व नागरी सेवा सुविधांची कामे मुंबईकर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यावेळी केले.